उध्दव ठाकरे यांनी सध्या कोकणचा दौरा सुरु केला आहे अशातच लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना त्यांच्या एका निष्ठावंत आमदाराने भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला, यामुळे उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. 1990 ते 2014 अशी सलग 25 वर्षे सुर्यकांत दळवी हे दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते.
दापोली मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. यामुळे ते पक्ष सोडून भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होतं. कोणताही निर्णय घेताना सूर्यकांत दळवी यांना विश्वासात घेतलं जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती
2019 पासूनच सूर्यकांत दळवी नाराज होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मातोश्रीकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी आशा त्यांना होती. दापोली विधानसभा मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी दळवी यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवल्याने दळवी यांच्या नाराजीत भर पडली. गेले काही दिवस ते उद्धव ठाकरे गटाच्या कार्यक्रमात दिसत नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत दळवी भाजपात प्रवेश कऱणार असल्याची चर्चा रंगली होती. आज अखेर पक्षप्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
.