ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार ठरणार अपात्र? सुनावणीला आज सुरुवात
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर शिवसेना कुणाची? यासंदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांना निकाली काढण्यास सांगितले. त्यानुसार बहुप्रतिक्षित असलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज विधानभवनमध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे.;
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं म्हटलं होतं. त्यानुसार आजपासून विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या आमदारांना अपात्रतेसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपलं लेखी म्हणणं सादर केलं आहे. त्यानंतर आजपासून दोन्ही गट विधानसभेत प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडणार आहेत. तसंच अपात्रतेसंदर्भात आमदारांकडून युक्तीवादही केला जाईल.
आज दुपारी 12 वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणीला सुरुवात होणार आहे. यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार आपल्या वकिलांसह सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे आमदार की शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार? याचा फैसला येणार आहे.