शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवन इथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप करत संजय राऊत यांनी आणखी काही गंभीर आरोप केले आहे. ED आणि EDचे काही अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन झाले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून EDचे काही अधिकारी आणि एजंट यांचे नेटवर्क तयार झाले आहे. बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट कंपन्यांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम हे अधिकारी आणि एजंट करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
यासर्व प्रकारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात आपण पुराव्यांसह तक्रार केली असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. यामध्ये ज्या ज्या कंपन्यांची ईडीने चौकशी केली, त्या कंपन्यांनी आपले पैसे जितेंद्र नवलानी यांच्या खात्यात जमा केले असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. हाच जितेंद्र नवलानी ईडीचे अधिकारी आणि एजंटच्या टोळीचा म्होरक्या असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. याच टोळीने बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्याकडून खंडणी उकळल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या कंपन्यांनी हा सर्व पैसा चेक, रोख आणि डिजिटल माध्यमातून जितेंद्र नवलानी याच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याचे उदाहरण देताना संजय राऊत यांनी २०१७मध्ये दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीवरील ईडीच्या कारवाईचे उदाहरण दिले आहे. एकीकडे चौकशी सुरू होताच दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीने जितेंद्र नवलानी याच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा करण्यात आले, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर २५ मार्च २०२० वाधवा आणि इतर लोकांनी जितेंद्र नवलानीच्या खात्यात पुन्हा १५ कोटी रुपये जमा केले.
अनिवाश भोसले यांनीही EDला खंडणी दिल्याचा आरोप
राज्यातील प्रसिद्ध विकासक अविनाश भोसले यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर तातडीने अविनाश भोसले आणि ग्रुपतर्फे जितेंद्र नवलानी यांच्या ७ कंपन्यांमध्ये १० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर संजय़ राऊत यांनी ईडीने कारवाई केलेल्या आणि त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या खात्यात त्या कंपन्यांनी जमा केलेल्या पैशांची माहितीही आपल्या पत्रकार परिषदेत दिली.
ही यादी प्रचंड मोठी आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच केवळ नवलानी यांच्याच एका खात्यात पैसे गेले असे नाही, तर इतरही काही जणांनी ईडीच्या कारवाईनंतर पैस वसूल केले असा आरोप राऊतांनी केली.
किरीट सोमय्या यांचा जितेंद्र नवलानी यांच्याशी संबंध काय?
यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि जितेंद्र नवलानी यांच्यात काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. नवलानी याच्या कंपनीचे ऑफिस नाही, कर्मचारी नाही मग या कंपन्या त्यांना कसले पैसे देत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. देशातील सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे रॅकेट दिल्लीत बसून चालवले जात आहेत, असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही हेच रॅकेट त्रास देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल
या तक्रारी आपण ईडीकडे करुन कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे आणि मुंबई पोलीस या खंडणीखोरांना शोधून काढतील, असा इशाराही संजय राऊत यांनी दिली आहे. या वसुली एजंटमध्ये भाजपचे नेतेही सहभागी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.