मुंबईत घुमणार I.N.D.I.A चा नारा, बैठकीकडे राज्याचं लक्ष

Update: 2023-08-30 07:50 GMT

लोकसभेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यातच विरोधी पक्षांनी मोदी सरकाविरोधात एकतेची वज्रमूठ आवळलीय....

2024 च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षांची एकजूट करायला हवी, असा विचार पुढे आला. त्यातून पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्या पाटणा येथील निवासस्थानी देशभरातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीची बंगळूरमध्ये बैठक झाली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आलं.

INDIA म्हणजे Indian National Developmental Inclusive Alliance…..

याच इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये बैठक पार पडणार आहे. त्यासाठी इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झालीय. तर या बैठकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर देण्यात आलीय.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतलाय. त्यातच आज दुपारी 4 वाजता पुन्हा अशोक चव्हाण हे बैठकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

त्यापुर्वीच राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

कसं असणार बैठकीचं वेळापत्रक? पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून....

30 ऑगस्ट - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

1) 31 ऑगस्ट- सायंकाळी 6 वा.

देशभरातील इंडिया आघाडीच्या नेत्यांचं ग्रँड हयात हॉटेलमध्ये स्वागत

2) 31 ऑगस्ट- सायंकाळी साडेसहा वाजता

इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण करण्यासाठी अनौपचारिक बैठक

3) 31 ऑगस्ट- रात्री 8 वाजता

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास डिनर

4) 1 सप्टेंबर - सकाळी 10 वाजता

इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रतिनिधींचे गृप फोटोसेशन

5) 1 सप्टेंबर - सकाळी साडेदहा ते दुपारी 2

इंडिया आघाडीच्या सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्वाची बैठक

6) 1 सप्टेंबर - दुपारी 2 वाजता-

महाराष्ट्र काँग्रेसक़डून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास जेवणाचे नियोजन

7) 1 सप्टेंबर - दुपारी साडेतीन वाजता

इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

त्यामुळे या दोन दिवसीय बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं लाँचिंग आणि सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी अकरा जणांची समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल. ही समिती अकरा जणांची असणार आहे. तसंच या बैठकीमध्ये जाहीरनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Tags:    

Similar News