राज्यात महायुती व मविआ चा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात
मविआतर्फे ४८ उमेदवारांची यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी शक्यता आहे.
लोकसभेची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याचे संकेत आहेत. त्यामूळे सर्वच पक्षांकडून जागावाटपाचे सूत्र अंतिम करण्याच्या दृष्टीने हालचाली सूरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमीत शाह यांच्या उपस्थितीत गुरूवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक पार पडली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील ११० ते १२० उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला. येत्या एक-दोन दिवसांत ही यादी जाहीर केली जाईल.
राज्यातही महायुती व महाविकास आघाडी या प्रतिस्पर्ध्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला आता शेवटच्या टप्प्यात पोहचला असून शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला असला तरी त्यांच्या ४ ते ५ जागा आपल्या ताब्यात घेण्याचा भाजपचा आग्रह आहे. लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नसल्याने व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटाने भाजपची ही अट मान्य करण्याची तयारी दाखवली आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २० ते २२, काँग्रेसला १५ ते १७ जागा मिळू शकतात. युती-आघाडीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना दुय्यम स्थान मिळणार असून युतीत अजित पवार गटाला व आघाडीत शरद पवार गटाला १० जागांच्या आतच समाधान मानावे लागणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला ३ जागा देण्यास आघाडीचे नेते तयार झाले आहेत. मविआतर्फे ४८ उमेदवारांची यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी शक्यता आहे.