विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय?आ. रोहित पवार
पोलीस अधिकारी सचिन वाझे अटक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा लेटर बोंबळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना विरोधी पक्षांच्या वर्तनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत..
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं.
गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं.
एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे.
हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या 'सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं', या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो.
अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा.
काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा.