...तर मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान 'वर्षा' नव्हे 'नंदनवन'!
होय बरोबर हेडलाईन वाचताय. यापुढे कदाचित मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'वर्षा' ऐवजी 'नंदनवन' होऊ शकतो. पण का आणि कसं? 'वर्षा' खरंच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान आहे का? नेमका इतिहास काय आहे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख!;
एकनाथ शिंदे यांनी बंड करून उध्दव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि नव्या सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ते राज्याचा गाडा हाकत आहेत. नवं सरकार स्थापन होऊन आता जवळपास एक महिना होत आला आहे. या महिन्या भरात आतापर्यंत चार ते पाच कॅबिनेट बैठका झाल्या आणि अनेक निर्णय देखील एकनाथ आणि देवेंद्र यांच्या जोडगोळीने घेतले पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांचं निवास स्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यात अद्यापही राहायला गेलेले नाहीत. यामागचं कारण मात्र अद्यापही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे हे त्यांचं सध्याचं निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्यालाच आता मुख्यमंत्री निवासस्थान करणार आहेत.
काय गंमत आहे पहा गेल्या ९ वर्षात ४ मुख्यमंत्री झाले. ज्यांनी आधी पाच वर्षे मुख्यमंत्री पद भुषवलं त्या देवेंद्र फडणवीस यांना 'वर्षा' बंगला सोडवत नव्हता. तो सुटू नये या प्रयत्नात त्यांच्या वाट्याला फक्त ८० तासाचा प्रयोग आला. अखेर त्यांना तो बंगला सोडावाच लागला.
त्यानंतर उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना 'वर्षा' बंगला सोडवत नव्हता तर उध्दव ठाकरेंना 'वर्षा' बद्दल काहीच अप्रुप वाटत नव्हतं. सुरूवातीचे २ ते ३ महिने तर ते सर्व शासकीय काम मातोश्रीवरूनच पाहत होते. यावरुन त्यांच्यावर बरीच राजकीय टीका देखील झाली. त्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आणि नाईलाजास्तव त्यांना 'वर्षा' गाठावंच लागलं. 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय देखील असतं. त्यामुळे त्यांना तिथे जाणं गरजेचंच होतं म्हणा! कोरोना काळामुळे उध्दव ठाकरे यांचा कार्यकाळ कसा निघून गेला हे कळालंच नाही. कोरोनाची परिस्थिती सावरते न सावरते तोच एकनाथ शिंदेंनी खेळी केली आणि उध्दव ठाकरेंचं सरकार अडचणीत सापडलं. अशात उध्दव यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे 'वर्षा' बंगला सोडणार असल्याचं सांगितलं आणि थेट त्याच रात्री मातोश्री गाठली. 'वर्षा' बंगल्याने त्या रात्री इतिहासात पहिल्यांदाच अभुतपूर्व गर्दी अनुभवली.
आणि आता नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत जे ठाकरे सरकारमध्ये वास्तव्य करत असलेल्या 'नंदनवन' बंगल्यावरच अजुनही वास्तव्य करत आहेत. आजच्या घडील जवळपास महिना होत आला पण अजुनही 'नंदनवन'ला जात असताना रस्त्यातच डाव्याबाजुला असलेल्या 'वर्षा'वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पावलं कधीच मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'कडे अद्याप एकदाही वळाली नाहीत. नेमकं एकनाथ शिंदेंना काय साध्य करायचं आहे? एकीकडे शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी त्यांची राजकीय लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्या लढाईवरच अजुनही या नव्या सरकारचं भवितव्य एकप्रकारे अवलंबून आहे. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे यांना 'वर्षा'वर जाण्याची घाई करायची नसेल. वरील केसचा निकाल आला आणि एकदा का सर्व शंका पुसट झाल्या की मग हक्काने कदाचित त्यांना 'वर्षा' गाठायचा असेल.
पण दुसरीकडे 'नंदनवन' बंगल्याची गेल्या काही दिवसांपासून नव्याने डागडुजी करायला घेतल्याच्या चर्चा आहेत. संरक्षण भिंतींची उंची वाढवणं, पोलिसांचा फौजफाटा वाढवणं अशा अनेक गोष्टी या बंगल्यावर घडत आहेत. अर्थात मुख्यमंत्री जिथे राहत असतील तिथे सुरक्षा अधिकच असणार! पण तरीही अशीही शक्यता आहे की नवे मुख्यमंत्री हे 'नंदनवन' वरच राहणार आहेत. म्हणजे यापुढे निदान पुढील काही काळ मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान हे 'नंदनवन' बंगला असू शकतो. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाहीये. कारण यापुर्वाही असं घडलेलं आहे.
असा झाला वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान
१९५६ ला मुंबई प्रांताचे कृषीमंत्री वसंतराव नाईक हे तेव्हाचा डग बिगन म्हणजेच आताच्या 'वर्षा' बंगल्यावर राहायला आले. त्यानंतर १९६३ साली अचानक त्यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्री पद आलं. त्यांनी तेव्हाची सह्याद्री बंगल्याची प्रथा मोडत 'वर्षा'वरच राहणं पसंत केलं. पुढे प्रदीर्घ काळ वसंतराव नाईक हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणजे 'वर्षा' असंच समीकरण बनलं. त्यानंतरचे सर्व मुख्यमंत्री हे 'वर्षा'वरच वास्तव्य करू लागले ते आजच्या उध्दव ठाकरेंपर्यंत! म्हणजेच यावरून आपल्या लक्षात एक गोष्ट आलीच असेल की 'वर्षा' हा काही मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान नाही.
ही प्रथा मोडून वसंतरावांप्रमाणे एकनाथ शिंदे एका नव्या बंगल्याला मुख्यमंत्री निवासस्थान म्हणुन ओळख मिळवून देणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. कारण गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे हे देखील 'वर्षा'च्याच शेजारी असलेल्या 'नंदनवन' बंगल्यावर राहत आहेत. ज्याप्रमाणे वसंतरावांचा 'वर्षा' बंगल्यावर जीव लागला होता त्याप्रमाणे एकनाथरावांचा जीव 'नंदनवना'त अडकला असेल तर काही सांगता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नवं निवासस्थान 'वर्षा' ऐवजी 'नंदनवन' झाल्यास आपल्याला नवल वाटायला नको.