मुंबईः विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. मागच्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आमदारांच्या निधी वाटपामध्ये भेदभाव केल्याचा आरोप केला जातोय. काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनीही आज विधानसभेत निधीवाटपाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले.
सभागृहामध्ये आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी निधीवरुन मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही अजित पवारांवर आक्षेप घेतला. आमदारांच्या निधीमध्ये कसलाही दुजाभाव केला नसून जे २०१९, २०२०२ आणि २१ मध्ये होतं, तेच सुरु ठेवल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
यशोमती ठाकूर यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, मी भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, परंतु तुम्ही चष्मा बदला, सावत्र भाऊ म्हणून बघू नका. ज्यावेळी कृषी महाविद्याल द्यायचे होते. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांचेही महाविद्यालय होते. आम्ही भेदभाव केलेला नाही. आमचे सरकार शहरी-ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. सर्वांना समान न्याय दिला जाईल. अंगणवाडी सेविकाच्या वाढीव मानधनाची रक्कम या पुरवणी मागण्यांमध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. तसेच, कांदा उत्पादकांसाठी साडेतीनशे रुपये क्विंटलप्रमाणे ५५० कोटी रुपये पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केले आहेत.
काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, " मला वाटलं होतं अजित दादा मोठ्या मनाचे आहेत. परंतु ते मोठ्या मनाचे नाही हे दिसतंय. सध्याच्या राजकारणात वेगळं वातावरण दिसत असल्याचं त्यांनी सांगितले. तर स्वतःचा मतदार संघ म्हणजेच महाराष्ट्र समजत असल्याचा" टोलाही आमदार यशोमती ठाकूर यांनी लगावला.
दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विकास कामांचा मुद्दा उपस्थित करीत, विकासकामावरील स्थगिती उठवा, अशी मागणी केली. त्यावर अजित पवारांनी स्थगिती दाखवा लगेच उठवतो, अशी भूमिका घेतली. विरोधकांच्या सर्व मुद्द्यांना अजित पवारांनी यावेळी उत्तर दिलं.