वाघ पाळले जात नाही, कुत्रे मांजरं पाळली जातात, सुषमा अंधारे यांचा रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल
बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते. त्याला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमधील गोळीबार मैदानावर घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर सभा घेतली. यावेळी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले की, बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. त्याला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खेडमधील प्रत्युत्तर सभेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटले होते की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray यांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. उध्दव ठाकरे यांनी सुभाष देसाई (subhash desai) यांच्यासारखी शेळी पाळली आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आम्ही लोकांवर टीका टिपण्णी करण्यात वेळ घालत नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करत आहोत. पण रामदास कदम म्हणतात की, बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. परंतु वाघ पाळला जात नाही. पाळायची तर कुत्री मांजर पाळता येतात. वाघ पाळता येत नाही तो स्वतंत्र असतो, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि हजारो ट्रॉलर्स एवढा सगळा रोज मारा होतोय. तरी देखील न खचता, न डगमगता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपलं काम करत आहेत. हे जंग जंग पछाडायचं काम करत आहेत. पण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उध्दव ठाकरे आपलं काम असंच पुढं सुरु ठेवतील.