सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांनी घेतली अर्थमंत्री सीतारामण यांची भेट
रायगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभुमीवर व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत खा. सुनील तटकरे आणि खा. सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली
रायगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासह पुरस्थिती निर्माण झाली आणि हजारोंचे जनजीवन विस्कळित झाले. या पार्श्वभूमीवर रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी खेड शहराच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कानावर व्यापारी वर्गाच्या विमा कंपन्याबाबतच्या अडचणी घातल्यानंतर आज दिल्लीत खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री ना.निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण येथील व्यापारी वर्गाच्या दुकानातील माल मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्यासंदर्भातील पंचनामा होईपर्यंत पुराच्या पाण्यात भिजलेले अन्नधान्य व कपडे तसेच खाद्य तेल दुकानातून न हलविण्याचे तसेच सर्व स्टॉकची नोंद व सविस्तर पावत्यांची माहिती सादर करण्याच्या जाचक अटी व नियम घालण्यात आल्याने विमा कंपन्यांकडून पंचनामा होईपर्यंत प्रचंड दुर्गंधीला व आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार असल्याचे समजून आले. यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान खा. तटकरे यांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कानावर ही अडचण सांगून 2005 प्रमाणे खा. शरद पवार यांनी विमा कंपन्यांना सहकार्य करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. यावेळी खा.पवार यांनी सदर विमा कंपन्यांची यादी मागवून सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती.
यानंतर आज दि.२ ऑगस्ट २०२१ रोजी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत टाटा एआयजी, एसबीआय जनरल, मणिपाल सिग्ना, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय लोम्बार्ड, बजाज एलियान्झ, मॅक्स बुपा, युनायटेड, ओरिएंटल, नॅशनल, न्यू इंडिया, एचडीएफसी, कोलामंडलम एमएस आदी विमा कंपन्यांचे ग्राहक या नैसर्गिक आपत्तीकाळात बाधित झाल्याने खा. तटकरे व खा. सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री ना. निर्मला सीतारामन यांना संबंधित विमा कंपन्यांनी ग्राहकांना सर्वतोपरी सहकार्य करून पुन्हा व्यवसाय धंदे सुरू करण्याकामी उभारी देण्याचे आवाहन केले. यावेळी संबंधित विमा कंपन्यांकडून ग्राहकांना निर्धारित रकमेच्या ५० टक्के रक्कम विनाविलंब देण्याची मागणीही केली.
सद्यस्थितीत, माल आणि मालमत्ता यांची सकृतदर्शनी १०० टक्के हानी झाली असताना विमा कंपन्यांकडून केवळ अन्याय्यरित्या रक्कम दिली जाऊ नये यासाठी खा. तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांत निसर्ग व तोक्ते ही दोन वादळं तसेच नुकताच झालेला विनाशकारी पाऊस एवढेच कारण नसून कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर असलेला लॉक डाऊन विचारात घेऊन विमा कंपन्यांकडून ग्राहकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मला सीतारामन यांना केले आहे.