लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग : सोनिया गांधीचा लोकसभेत गंभीर आरोप
सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे . राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सांगत ट्वीटर आणि फेसबुकचा स्पष्ट उल्लेख केला.
"मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करत आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचं प्रमाण वाढत आहे," असं सोनिया गांधी म्हणाल्या.
अलजहीरा आणि रिपोर्टर कलेक्टिवच्या अहवालाचा उल्लेख करत वॉल स्ट्रिट जर्नलने यापूर्वी धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर होत असल्याकडे लक्ष वेधले. सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचं वारंवार समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशारा सोनिया गांधींनी यावेळी दिला.