सांगली-जळगावनंतर आणखी 'करेक्ट कार्यक्रम', शिवसेनेचा भाजपला इशारा

सांगली आणि जळगाव महापालिकेत भाजपला शह मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला मोठा इशारा देण्यात आला आहे.;

Update: 2021-03-20 02:45 GMT

सांगली महापालिका आणि जळगाव महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांना फोडत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. जळगावमधील सत्ताबदलाला गिरीश महाजन यांचा अहंकार कारणीभूत असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच भाजपला भविष्यात आणखी अशा धक्क्यांचा इशारा देण्यात आला आहे. काय म्हटले आहे या अग्रलेखात ते पाहूया...

जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील!

जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे,पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे.

महाराष्ट्रात 105 आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. या अनुभवांतून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच. सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात.

असा टोमणाही सामनामधून मारण्यात आला आहे.

Tags:    

Similar News