भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शागीर्द यशवंत जाधव यांनी महापालिका कंत्राटांमधून मिळवलेला पैसा मनी लाँडरिंगद्वारे वळता केला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचे शागीर्द यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपये मनी लॉँडरिंगद्वारे वळवले, तसेच कंपनीचा १ रुपयाचा शेअर ५०० रुपयांना विकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले.
कोलकात्याच्या उदयशंकर महावा या व्यक्तीने त्यांच्या शेल कंपन्यांमार्फत यशवंत जाधव यांच्याकडून १ रुपयाचा शेअर ५०० रुपयांना विकत घेतला, असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्या १५ कोटी रुपये रकमेचा १०० टक्के कॅश ट्रेल काढल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये सीनीअर आयएएस ऑफिसरला किती गेले, कोणत्या कंत्राटदाराकडून किती आले याची सगळी माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी माहिती दिल्याप्रमाणे यशवंत जाधव यांनी प्रधान बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना २० मार्च २०१२ रोजी केली. या कंपनीमध्ये उदयशंकर महावा हे देखील भागीदार आहेत. पण १० दिवसात म्हणजेच ३० मार्च २०१२ रोजी कंपनीने यशवंत जाधव यांच्याकडून ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर याच कंपनीचे शेअर्स कोलकात्याच्या बोगस कंपन्यांनी १५ कोटींना विकत घेतले. कालांतराने ते १५ कोटी यशवंत जाधव, त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आणि त्यांच्या दोन मुलांच्या खात्यात व इतर काही जणांच्या खात्यात जमा झाले. पण प्रत्यक्षात ही कंपनीच अस्तित्वात नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.