केंद्रीय बजेटमध्ये गुजरातला महाराष्ट्रापेक्षा झुकते माप दिले गेल्याचा आरोप होतो आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे. ते नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय संस्थाना अर्थसंकल्पात मोठा निधी देण्यात आला आहे. मात्र, मुंबईतही आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र उभारले जात आहे. मुंबईतील या आंतरराष्ट्रीय केंद्राला केंद्र सरकारकडून निधी देण्यात आलेला नाही यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. काँग्रेसपेक्षा भाजपच्या काळात मुंबईला अधिक ओरबाडले जात आहे. यावर भाजप नेत्यांचं काय मत आहे असा सवाल राऊत यांनी केला आहे.
गुजरातमधील गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटी सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातला नेल्याने मोदी सरकारवर आधीच टीका होते आहे. त्यात आता गुजरातमधील गिफ्ट सिटी जास्त सक्षम करण्यावर सरकारने बजेटमध्ये प्राधान्य दिले आहेत. मात्र यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबईला ओरबडण्याचा हा प्रकार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राज्यातील उद्योग पळवण्याचा हा प्रकार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई देशासाठी दरवर्षी अडीच लाख कोटी रुपये कररुपाने देते. गुजरातचा विकास करायचा कर करा, पण तो सरकारने आपल्या पैशाने करावा दुसऱ्याच्या पैशावर बाजीरावगिरी का करता असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.