काँग्रेसच्या 'गळती'मुळे शिवसेना चिंतेत

राज्यातील ऊसाचा गाळप अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेस पक्षाचे गाळप सुरू झाल्याप्रमाणे चिंतन शिबीरापाठोपाठ बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर शिवसेना चिंतेत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Update: 2022-05-21 04:18 GMT

काँग्रेसचे चिंतन शिबीर उदयपुर येथे पार पडले. यावेळी काँग्रेसने अनेक प्रश्न अधांतरी सोडले आहेत. याच कारणास्तव काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेस सोडून जात असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. मोदी सरकार करत असलेल्या 2024 च्या निवडणूकीची तयारी आणि काँग्रेसला लागलेल्या गळतीच्या हंगामामुळे काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. तसेच हे चित्र संसदीय लोकशाहीसाठी चांगले नसल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

चिंतन शिबीरानंतर काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळं कुठं कुठं लावावेत असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे. पंजाबमधील काँग्रेस नेते सुनिल जाखड असो की गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून गळती लागण्याचा प्रकार काँग्रेससाठी नवा नाही. मात्र सोनिया गांधी ते राहुल गांधी सगळ्यांनीच काँग्रेसच्या बांधणीसाठी हाक दिली असताना काँग्रेसला लागलेली गळती चिंता वाढवणारी असल्याचे सामनात म्हटले आहे.

पंजाबचे एकेकाळचे दिग्गज नेते सुनिल जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेसला काही सवाल केले आहे. तसेच हार्दिक पटेल यानेही काँग्रेसला रामराम करताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांवर काँग्रेसने चिंतन करण्याची गरज आहे.

काँग्रेसने पंजाबमध्ये सिध्दू यांना अवाजवी महत्व देण्याच्या नादात जाखड यांना बाजूला केले. त्यावरून जाखड यांनी म्हटले की, मी राष्ट्रहिताविषयी बोलत असताना काँग्रेस मला नोटीस देत होती. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुनिल जाखड यांनी केला.

काँग्रेसच्या चिंतन शिबीरात एक पद एक व्यक्ती असा नारा दिला. मात्र काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष देता आला नाही. त्याबरोबरच अनेक राज्यांना प्रदेशाध्यक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसची वाताहत सुरू असल्याचे सामनातून म्हटले आहे.

हार्दिक पटेलने काँग्रेस सोडताना म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा पक्षाला आणि देशाला गरज असते तेव्हा हमखास देशाबाहेर असतात, असा टोला लगावला. तर दुसरी गोष्ट म्हणजे, उठसूठ अदानी आंबानीला शिव्या देऊन कसे चालेल. कारण आज अनेकांचे अदानी आंबानी होण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे तुम्ही सामान्य नागरिकांच्या आदर्शांना शिव्या घालून निवडणूक जिंकू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे सुनिल जाखड यांच्यानंतर हार्दिक पटेल याने काँग्रेस सोडली. त्यामुळे काँग्रेसची अवस्था ठिगळं कुठं लावू अशी झाली आहे. तर ही ठिगळं वाढत जाण्याचीच चिन्हे आहेत. हे चित्र संसदीय लोकशाहीसाठी बरे नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Tags:    

Similar News