काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासह राज्याच्या विविध मुद्दयांवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे या दोघांची काही वेळासाठी स्वतंत्र भेट झाली. या भेटीनंतर राज्यात वेगळ्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना-भाजप एकत्र येणार का, पंतप्रधान मोदींबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, यावर भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुका एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद झाले. त्यातूनच मग शिवसेनेने युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले. आता महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही भाजपच्या नेत्यांकडून हे सरकार कधीही कोसळेल असे सांगितले जाते आहे.
पंतप्रधान मोदींशी वैयक्तिक वाद नाही
राज्यात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही, असे संजय राऊत यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. सेना-भाजप युती तुटली म्हणून मोदी शिवसेनेचे शत्रू होत नाहीत, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे कधीही भांडण नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने महाराष्ट्र सध्या संकटात असताना त्यांच्याकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे ध्येय आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी सरकारचे काय?
पण याचवेळी संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला. राज्य सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आहेत. आमच्या सातत्याने बैठक झाल्या किंवा नाही झाल्या तरी सरकार स्थिर आहे आणि 5 वर्ष पूर्ण करणार असे राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला सल्ला
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले होते. त्यासंदर्भातल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केलेल्या मताचा आदर करुन काँग्रेसने त्यावर विचार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.