शिवसेनेची 'बकरी सेना' झाली आहे, नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. त्यातच पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करत नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.;
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनेकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुंबईत राणे विरुध्द शिवसेना असाही संघर्ष पहायला मिळतो. मात्र आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी शिवसेनेला बकरी सेना म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी जिल्ह्यातील देवबाग येथे बोलत होते. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. मात्र राज्य सरकार फक्त लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळे विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यामध्ये महाराष्ट्र मागे पडत आहे. म्हणून हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सराकर येईल आणि ते पुढील 50 वर्षे कायम राहिल असा विश्वास आहे, असे नारायण राणे म्हणाले.
पुढे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्यातील मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामध्ये राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना वेगळी होती. त्यांची भुमिका आणि आत्ताची भुमिका यामध्ये बदल झाला आहे. एवढंच नाही तर आत्ताची शिवसेना ही बकरी सेना झाली आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.