"शिवसेना-भाजप विचारसरणीने जोडलेले राहणार" संजय राऊत यांचे मोठे विधान

Update: 2021-08-27 08:05 GMT

नारायण राणे यांची टीका आणि त्यानंतरच्या अटक नाट्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेला उभा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. पण आता शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विचारसरणीने कधीही दुरावले नव्हते असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मूळ भाजपचे जे लोक आहेत, त्यांनी कधीही शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर अशी टीका केली नव्हती. पण भाजपमध्ये जे बाहेरुन आले आहेत, त्यांनीच अशाप्रकारे टीका केल्याने वाद निर्माण झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे मोदींशी काय संबंध होते आणि आहेत ते या बाहेरुन आलेल्या नेत्यांना माहिती नाही, या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. राणे यांना टीका करण्याचा अधिकार आहे पण कमरेखालची टीका करायला लागलात तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असे राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणनीस, विनोद तावडे, आशीष शेलार हे मुळ भाजपचे असलेले नेते शिवसेनेवर या शब्दात कधीही टीका करत नाही, पण बाहेरुन आलेले लोक शिवसेना भवन फोडण्याची भाषा करतात, त्यांना आवरण्याची गरज असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपचे शुद्धीकरण केले पाहिजे असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News