तिसऱ्या लाटेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मेळाव्यावर-मेळावे
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची बातमी आजच आली आहे. त्यामुळे देशात तिसऱ्या लाटेच संकट निर्माण होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. पण असे असताना राज्यात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसरी लाट येऊ नयेत म्हणून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करतायत तर दुसरीकडे मात्र शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांचे मेळावे काही थांबायला तयार नाहीत. त्यामुळे कोरोनाबाबत शिवसेनेची भूमिका म्हणजे दुप्पटी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना शिवसेनेचे नेतेच नव्हे तर मंत्री सुद्धा कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात पैठणमध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित भव्य प्रवेश सोहळा पार पडला यावेळी हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळाली होती.
त्यात आता परवा ( 4 सप्टेंबर ) रोजी जुन्नर येथे शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात आला असून,शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" अशी अवस्था शिवसेनेची झालेली पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे तुम्हाला पटतंय का?
आपल्या प्रत्येक भाषणात आणि कार्यक्रमात कोरोनाला पळवून लावण्याचा आणि सर्वसामन्यांना कोरोनाचे नियम पाळण्याचा सल्ला मुख्यमंत्री देत असताना पाहायला मिळत आहे. पण मुळात शिवसैनिकच सर्वात आधी उद्धव ठाकरेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. विशेष म्हणजे अनेक नेते आपल्या कार्यक्रमांची माहिती आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करून उद्धव ठाकरेंना टॅग सुद्धा करतात. पण तरीही मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना आवरत नसेल तर त्यांनी सर्वसामान्यांकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे,असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.