मुख्यमंत्री-राज्यपाल वादात शरद पवारांची उडी
:कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील बंद असलेली प्रार्थनास्थळं बंद असताना भाजप मंदीरं उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करत असताना मंदीर वादात राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्रांची जुगलबंदी सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांचे कृत्य घटनाविरोधी असल्याचे सांगत थेट पंतप्रधान मोदींकडे राज्यपालांवर कारवाईची मागणी केली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला दिलासा मिळत रुग्णसंख्या घटत असताना आता राज्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र पुन्हा एकदा राजभवन भोवती केंद्रीत झाले आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचे भाकीत वर्तवल्यानंतर आज राज्यभरात भाजपने मंदीर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिदुत्वावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला हिंदुत्व शिकवू नका अशा शब्दात राज्यपालांना उत्तर दिले आहे.
दिवसभर राज्यपाल - मुख्यमंत्री वाद रंगल्यानंतर उशिरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वादात उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्यपालांची तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे. शरद पवार त्यांच्या पत्रात म्हणतात, हे माध्यमाद्वारे माझ्या निदर्शनास आणले गेले, मा. महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या पत्रात मा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप करुन लोकांसाठी धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी केली आहे.
मी मान्य करतो की मा. राज्यपालांची या विषयावर आपली स्वतंत्र मते असू शकतात. या पत्राद्वारे आपले मत व्यक्त करण्यासाठी राज्यपालांच्या या प्रयत्नांचे मी कौतुक करतो, परंतु राज्यपालांचे पत्र माध्यमांना प्रसिद्ध करण्यात आले आणि हे पत्रात वापरल्या जाणार्या भाषेचा वाचून मला आश्चर्य वाटले. घटनात्मक पद धारण केलेल्या व्यक्तीसाठी हे भाषा उचित नाही. पत्राबाबतचे मी माझे मत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे. मला खात्री आहे की त्यांनासुद्धा वापरली गेलेली भाषा लक्षात आली असेल.
आमच्या राज्यघटनेच्या अगदी प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडला गेला आहे. ज्यामध्ये सर्व धर्म समान आहेत आणि त्यांचे रक्षण होते आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीने संविधानीक कृतींचे समर्थन केले पाहिजे. दुर्दैवाने मा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिल्यासारखे वाटत आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना कळवल्या आहेत.