शरद पवार कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेरणास्रोत- सुजात आंबेडकर
शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणानंतर राज्यात शरद पवार यांनी हिदू देवदेवतांचा अपमान केल्याची टीका करण्यात येत होती. दरम्यान शरद पवार यांच्याविषयी अभिनेत्री केतकी चितळे हीने हीणकस भाषेत ट्वीट केले. त्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यावर प्रतिक्रीया देतांना सुजात आंबेडकर यांनी शरद पवार हे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी प्रेरणास्रोत आहेत असे म्हटले.
शरद पवार यांच्यावर केतकी चितळेने ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तर सध्या सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हाच धागा पकडून सोशल मीडियाचा सर्वांनी लक्षपुर्वक वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या जे काही ट्रोलिंग होत आहे ते चुकीचे आहे. या ट्रोलिंगमुळे नेत्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चितळे हीने जे वक्तव्य केले आहे. ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे आहे.
एखाद्या व्यक्तीला जर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर त्या व्यक्तींच्या धोरणांवर, भुमिकांवर आणि राजकारणांवर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले.
शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्याविषयी महाराष्ट्राला आदरच आहे. त्यांच्याविषयी असे अशोभनिय वक्तव्य करणे शोभनीय नाही. तर पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, जगभरातील कॅन्सर रुग्णांसाठी शरद पवार हे एक प्रेरणा आहेत. ते या वयातही इतक्या लोकांसोबत बोलतात, दौरे करतात, भाषणं करतात. त्यामुळे अशा नेत्यांबद्दल असं बेताल वक्तव्ये करणे अत्यंत चुकीचे आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
तसेच राज्यात कोण कोणाची ए टीम बी टीम अशी चर्चा रंगलेली असते. त्यावर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, कोण कोणाची ए टीम बी टीम हे शोधण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, पाणीप्रश्न अशा छोट्या छोट्या मुद्द्यांवर माध्यमांनी रिपोर्ट केले पाहिजेत, असा सल्ला सुजात आंबेडकर यांनी दिला.