एक ही मारा सॉलिड मारा, पवारांचं फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिलला 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले.;

Update: 2022-04-15 11:52 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis 14 tweet) यांनी 14 एप्रिलला 14 ट्वीट करून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामध्ये 12 मार्च 1993 रोजी झालेल्या मुंबईतील बाँबस्फोट प्रकरणी शरद पवार यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप केला होता. तसेच शरद पवार हे धार्मिक तुष्टीकरण केल्याचेही म्हटले होते. त्या आरोपांना शरद पवार यांनी जळगाव येथे बोलताना एका वाक्यात उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले की, 12 मार्च 1993 (1993 bomb blast Mumbai) रोजी मुंबईत 11 बाँबस्फोट झाले होते. मात्र मी 12 बाँबस्फोट (Mumbai Bomb blast) झाले असे सांगितले. त्याचे एकमेव कारण होते की, त्या बाँबस्फोटापुर्वी 15 दिवस आधीपर्यंत मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. त्यामुळे पहिल्या बाँबस्फोटाच्या ठिकाणी आढलेले स्फोटक साहित्य हे भारतात तयार केले जात नसल्याचे आढळले. तर ते साहित्य पाकिस्तानातील कराची येथे बनवले जाते, हे दिसून आल्याने या बाँबस्फोटामागे परकीय शक्तींचा हात आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे या बाँबस्फोटामागे देशातील हिंदू-मुस्लिम दंगली भडकवण्याचा डाव असण्याची शक्यता वाटल्याने मी 12 वा बाँबस्फोट मोहम्मद अली रोड येथे झाल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईतील सलोखा कायम राखता आला, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. (Why Sharad pawar lie on the Mumbai Bomb blast in 1993)

शरद पवार पुढे म्हणाले की, न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली श्रीकृष्ण आयोगाची स्थापना केली होती. त्या आयोगाने शरद पवार यांना तुम्ही खोटं बोलले आहात असा प्रश्न विचारला. त्यावर मी हो असं उत्तर दिले. तसेच त्यांना यामागची भुमिका समजावून सांगितली. त्यामुळे या आयोगाच्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहीले होते की, मुख्यमंत्री पवार यांनी अशा प्रकारची भुमिका घेतली नसती तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे अशा प्रकारे परकीय शक्तींमुळे देशातील हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली होऊ नये म्हणून मी ती भुमिका घेतली, असे उत्तर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले. (Sharad pawar answered to Devendra fadanvis allegation)

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 रद्द करण्याबाबत घेतलेल्या भुमिकेचे फडणवीस यांनी शरद पवार यांना स्मरण करून दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना राष्ट्रवादीने घेतलेल्या भुमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे.

तसेच शरद पवार विविध विधाने करत असतात. त्यामुळे त्यांचे काश्मीर फाईल्सवरचे विधान आश्चर्यकारक नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच ते राष्ट्रवादीच्या ध्रुवीकरणाच्या ट्रॅक रेकॉर्डशी संबंधीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

राष्ट्रवादीची धार्मिक ध्रुवीकरणाबाबतची भुमिकेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा दाखला दिला आहे.

2013 मध्ये इशरत जहाँ प्रकरणात शरद पवार यांनी ती निर्दोष असल्याचे विधान केले होते.

शरद पवार इशरत जहाँला फक्त निर्दोष आहे एवढेच म्हणाले नाही तर त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला. याबरोबरच शरद पवार यांनी IB ला बदनाम करण्याचाही प्रयत्न केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

2012 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत असताना आझाद मैदान येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीने रझा अकादमी विरोधात मवाळ भुमिका घेत मुंबईचे आयुक्त बदलल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

संविधानात धर्मानुसार कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची तरतुद नसताना मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मालेगाव बाँबस्फोटानंतर शरद पवार यांनी हिंदू दहशतवाद ही नवी संकल्पना मांडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राजकीय पक्षांनी सुधारणांची अंमलबजावणी करणे ही आदर्श गोष्ट आहे. मात्र शरद पवार यांनी आधी सच्चर समितीच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला.

12 मार्च 2012 रोजी मुंबईत 12 बाँबस्फोट घडले होते. मात्र त्यावेळी 13 वा बाँबस्फोट मुस्लिम वस्तीत घडल्याचे सांगत शरद पवार यांनी कायदा सुव्यवस्थेऐवजी धार्मिक तुष्टीकरणाला महत्व दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

यावेळी फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जातीय सलोख्याची अपेक्षा असताना राष्ट्रवादीचा असा दुटप्पीपणा का? काश्मीरी पंडितांच्या दुःखाची खरी कहाणी सांगणारा चित्रपट फक्त त्यांच्या नकली धर्मनिरपेक्ष अजेंड्याशी जुळत नाही म्हणून काश्मीर फाईल्स चित्रपटाला विरोध का? असे सवाल उपस्थित केले आहेत.

पुढे फडणवीस म्हणाले, काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तर हा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या विरोधात आहे. ज्यामुळे त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकीय अजेंड्याला धक्का लागू शकतो. त्यामुळे त्यांचा फुट पाडण्याचा प्रकार सुरू आहे.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशात असा प्रकार स्वीकारार्ह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी थ्रेड संपवला. त्यामुळे राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

Tags:    

Similar News