..म्हणून तुमचं मुख्यंत्रीपद गेलं..., संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत नागपुर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.;
राज्यात भाजप शिवसेना वाद टोकाला गेला आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या नागपुर दौऱ्यावर बोलताना म्हटले होते की, नागपुरच्या मातीत एक वेगळेपण आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार नागपुरला आले तर त्यांना थोडी सुबुध्दी येईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर संजय राऊत यांनी एका सभेत प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, दुर्देवाना तुम्हाला सुबुध्दी आली नाही. त्यामुळे तुमचे मुख्यमंत्रीपद गेलं. तसेच त्यावेळी तुम्हाला सुबुध्दी आली असती की, शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. हिंदूत्ववादी पक्ष आहे. आपण त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे. ही सुबुध्दी आली असती तर आपण कदाचित मुख्यमंत्री असता, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला दिले. तसेच तुम्हाला तेव्हा दुर्बध्दी सुचली आणि सुबुध्दीची अक्कल तुम्ही देत आहात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, नागपुरला ममत्व आहे. कारण नागपुर आमची उपराजधानी आहे. तसंच नागपुरकरांचे प्रेम वाढत आहे. मात्र बरेचसे नागपुरकर हल्ली मुंबईत असतात. त्यामुळे आम्ही नागपुरला आलो आहोत, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.