NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे (ncp )नेते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) सातत्याने आरोप करत आहेत. एकीकडे आर्यन खान(Aryan khan) प्रकरणात साक्षीदाराने मोठा गौप्यस्फोट केल्याने समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे मलिक यांनी सोमवारी एक ट्विट करत समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला जाहीर केला, यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असून आईचे नाव झायदा आहे, तर धर्म मुस्लिम आहे, असे म्हटले आहे. "समीर दाऊद वानखेडे….यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण
पण मलिक यांच्या या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे उत्तर दिले आहे. यामध्ये वानखेडे यांनी सांगितले आहे की, "माझे वडील श्री. ज्ञानदेव कचरु वानखेडे आहे. ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ३० जून २००७ रोजी निवृत्त झाले आहेत. माझे वडील हिंदू आहेत आणि माझी दिवंगत आई झहीदा मुस्लिम होती. भारतीय परंपरेचा विचार करता खऱ्या अर्थाने मी संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातून आहे आणि मला या वारशाचा अभिमान देखील आहे. २००६मध्ये मी डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी विवाह केला. पण २०१६ मध्ये आम्ही एकमेकांच्या संमतीने सिव्हील कोर्टात घटस्फोट घेतला. नंतर २०१७मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकरशी विवाह केला.
माझी वैयक्तिक कागदपत्रे ट्विटरवर प्रसिद्ध करणे हे बदनामीकारक आहे आणि माझ्या परिवाराच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा आणणारे आहे. मी, माझा परिवार, माझे वडिल आणि माझ्या दिवंगत आईची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे हेतुपुरस्सर केले गेले आहे. माननीय मंत्र्यांनी गेल्या काही दिवसात जे आरोपांचे सत्र चालवले आहे, त्यामुळे मी आणि माझे कुटुंबिय मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तणावात आहोत. कोणतेही सबळ कारण नसताना माननीय मंत्र्यांनी वैयक्तिक, बदनामीकारक हल्ले केले असल्याने मला प्रचंड वेदना होत आहेत"
असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. दरम्यान झी २४ तास वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांचे सर्व आऱोप फेटाळले आहेत. आपले नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे आणि आपली सगळी कादगपत्र ज्ञानदेव नावाने आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.