समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते का? सुप्रिया सुळे यांनी दिला दाखला

छत्रपती शिवाजी महाराज यांचे समर्थ रामदास हे गुरू होते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. पण त्यांचे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत हायकोर्टाच्या निकालाचा दाखलाच दिला आहे.

Update: 2022-02-28 05:18 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. भगतसिंह कोश्यारी हे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. "समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं का? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

राज्यपालांचे वक्तव्य काय?

"आपल्या देशात गुरूची परंपरा मोठी आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. त्याप्रमाणेच समर्थ नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसता तर सर्माट अशोक असता का? असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून राज्यात नवा वाद पेटला आहे." आपण शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असे नाही, असे स्पष्ट करत राज्यापालांनी आपली भूमिका मांडली, "ज्या माणसाला गुरू नाही. त्याची महती उरत नाही. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांच्या कृपेने स्वराज्य मिळाले, असे शिवाजी महाराज सांगतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समर्थांना स्वराज्याच्या चाव्या गुरुदक्षिणा म्हणून देण्याची तयारी दाखवली होती, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांचा आक्षेप

पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावरुन राज्यपालांचा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे.यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेटच झाली नव्हती, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.

"मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार... 'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.'

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी (@PawarSpeaks) स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,"जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं...रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी... त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे, हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले." 
राज्यापालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.

Similar News