मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामी कटाचा सूत्रधार भारतीय जनता पक्षच : सचिन सावंत
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर देताना अभिनेत्री कंगना राणावत हिनं केलेल्या एका त ट्वीटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाचा समाचार घेतानाच भाजपलाही लक्ष्य करत मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या बदनामी कटाचा सूत्रधार भारतीय जनता पक्षच असल्याचं म्हटलं आहे.
BJP ko khush karke.....
महाराष्ट्राची, मुंबई पोलीसांची बदनामी ही भाजपा ला खुश करण्यासाठी होती. @BJP4Maharashtra या कटाची सूत्रधार होती याचा हा कबूलनामा आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध! pic.twitter.com/2F2Py3YfaT— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 3, 2021
उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे नवीन कार्यालय खरेदी केलं आहे. अर्थात, या कार्यालयाच्या खरेदीचा राजकारणाशी किंवा शिवसेना प्रवेशाशी अजिबात संबंध नाही, तिनं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यावरून कंगनानं काल त्यांना ट्विट करत निशाना साधला होता. 'मी स्वत:च्या कष्टानं बांधलेलं घरही काँग्रेसनं तोडून टाकलं. भाजपला खूष करून माझ्या मागे फक्त २५-३० कोर्टाचे खटले लागले. मी सुद्धा हुशारीनं काँग्रेसला खूष केलं असतं तर बरं झालं असतं. मी खरंच मूर्ख आहे,' असं ट्वीट तिनं केलं होतं.
उर्मिला मातोंडकर यांनीही कंगनाला उत्तर दिलं होतं. 'वेळ आणि जागा तू सांग. माझ्या खरेदीच्या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन तुला भेटायला येते. माझ्या व्यवहाराचा राजकारणाशी संबंध नाही हेही तुला दाखवील, असं उर्मिला यांनी म्हटलं होतं.
गणपति बाप्पा मोरया 🙏🏼@KanganaTeam pic.twitter.com/m8mRgbsg6o
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 3, 2021
उर्मिला व कंगनामध्ये सुरू असलेल्या या वादात काँग्रेसनं उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाचं ट्वीट रीट्वीट करत भाजपला लक्ष्य केलं आहे. 'भाजपला खूष करण्यासाठी कंगनाला महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी केली, असं तिनं म्हटलं आहे.
हा एक प्रकारचा कबुलीजबाब आहे आणि महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा सूत्रधार भाजप आहे हे यातून स्पष्ट झालंय,' असं सावंत यांनी म्हटलं आहे. 'भाजपनं नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही. जाहीर निषेध!,' असंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसनं माझं घर तोडून टाकल्याच्या कंगनाच्या आरोपाचाही सावंत यांनी समाचार घेतला आहे. 'कंगनाचं घर तुटण्याशी काँग्रेसचा अजिबात संबंध नाही. मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे,' याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे.