'जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत', रुपाली चाकणकरांचा पंतप्रधानांवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा आज केली. खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, अशी देशातील अनेकांनी इच्छा होती असं म्हणत या पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही घोषणा केली.
मात्र, या निर्णयानंतर मोदी सरकारवर चहू बाजूने टीका होतांना दिसत आहे. खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.
मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोणत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे. असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी "जनतेची मागणी" म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे... चांगलं आहे. जनतेच्या अजूनही काही छोट्या- छोट्या मागण्या आहेत, महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या , आणि राजीनामा द्या. असं ट्विट करत चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा उद्योग हा राजकिय हेतूने केला असल्याची टीका होत आहे. याआधी देशातील एका मोठ्या स्टेडिअमला पंतप्रधान मोदींचे नाव देण्यात आले होते. आता खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. त्यामुळे केवळ एखाद्या गोष्टींचे नाव बदलून राजकारण करण्यातच देशाचे पंतप्रधान व्यस्त असल्याची टीका विरोधकांकडून होतांना दिसत आहे.