ओबीसी आरक्षण : रोहिणी खडसेंचा पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला

Update: 2021-06-24 09:44 GMT

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने सध्या ओबीसी समाजात मोठा संताप निर्माण झाला आहे. तर याच मुद्द्यावरुन ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे. आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे नेते करत आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 तारखेला मोठा मोर्चा काढण्याचा इशारासुद्धा भाजपने दिला आहे. तर नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये खुल्या वर्गातून सर्व ओबीसी उमेदवार देऊ अशी घोषणा रोहिणी खडसे यांनी केली आहे.

फडणवीस यांच्या या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे. रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,

"भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही."

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच रोहिणी खडसे यांनी भाजपवर असा थेट हल्ला केला आहे. रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना फडणवीस यांनी अडगळीत टाकल्याचा आरोप होतो. खुद्द खडसे यांनी देखील फडणवीस यांच्यामुळे आपल्याला पक्ष सोडावा लागल्याचे म्हटले होते. तर पंकजा मुंडे यादेखील नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News