रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून म्हणजेच १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक जागांवरून निर्माण झालेला तिढा काही अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत? यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यातील २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही त्यापैकीच एक जागा आहे. मात्र महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांच्या अनेक पारंपरिक जागा भाजपासाठी सोडल्या आहेत. महायुतीत शिंदे गटाला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागांसाठी शिंदे गट आग्रही होता.
मात्र, आता शिंदे गटाने या मतदारसंघातूनही माघार घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. आता नाशिकची जागा तरी शिंदे गटाला मिळतेय की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.
रत्नागिरी - सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे