Rajyasabha election : राज्यसभा निवडणूकीत माघार न घेतल्याने संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकारण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माघार घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतर उमेदवार माघार न घेतल्याने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.;
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्याने हा सामना अटीतटीचा झाला आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही भाजपने आपला उमेदवार माघारी न घेतल्याने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन ही जागा बिनविरोध करावी, यासाठी महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. इतकंच नाही तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. त्याबाबत कोणीही चिंता करू नये. मात्र विरोधी पक्षाने ही निवडणूक आमच्यावर लादली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच या निवडणूकीत घोडेबाजार अजिबात होणार नाही. मात्र ज्यांना करायचा असेल त्यांनी करावा. कारण आमचा आमच्या लोकांवर विश्वास आहे आणि आम्ही संपुर्ण नियोजन केले आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडीकडे असलेले संपुर्ण बहुमत पाहता आमचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे राज्यसभेसोबतच इतर विषयांवरदेखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच ही निवडणूक आम्ही सर्वांनी स्विकारली असून आम्हाला आमचं बळ दाखवण्याची संधी मिळाली असल्याची संधी मिळाली आहे. मात्र विरोधी पक्षाला निकाल लागल्यावर पश्चाताप होईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.