Agnipath Scheme : अग्निपथ योजनेबाबत विरोधकांचे संकुचित राजकारण- संरक्षणमंत्री
अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरातून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यापार्श्वभुमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्यानंतर देशात युवकांनी या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. तर या योजनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अग्निपथ या योजनेविषयी विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. तसेच अग्निपथ ही योजना नवी असल्याने याविषयी देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र हा निर्णय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक तज्ज्ञांशी व्यापक प्रकारे सल्लामसलत करून घेण्यात आला आहे. तर या निर्णयामुळे देशातील नागरिकांमध्ये व्यापक देशाभिमान निर्माण होईल. त्यामुळे व्यापक देशाभिमान आणि शिस्त असावी, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे हा निर्णय महत्वाचा आहे.
यावेळी राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेस विरोधाची काही राजकीय कारणे असू शकतात, असे म्हटले. मात्र यावेळी कोणत्याही विरोधी पक्षाचे नाव घेतले नाही. याबरोबरच राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर हल्लाबोल करताना म्हटले की, राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आपण विरोधात असू की सत्तेत राजकारण हे देशहिताचेच असावे. त्यामध्ये युवकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रकार बरोबर नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.
यावेळी अग्निपथ योजनेंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या अग्निवीरांना सरकारी, निमसरकारी, खासगी आणि निमलष्करी दलातील विविध सेवांमध्ये नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी सरकारी पातळीवर योजना
आणण्यावर काम सुरू आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करूनही अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेल याची तरी कुठे शाश्वती असते, असा सवाल राजनाथ सिंह यांनी केला.
अग्निपथ या योजनेच्या माध्यमातून लष्कराच्या प्रशिक्षणात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसंच लष्कराला ज्याप्रकारे प्रशिक्षण दिले जाते. त्याच प्रकारे प्रशिक्षण अग्निविरांनाही दिले जाईल, असंही यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.
काय आहे अग्निपथ? (What is Agnipath)
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसोबत पत्रकार परिषद घेऊन अग्नीपथ या योजनेची घोषणा केली. तसेच ही योजना भारतीय लष्कराला तरूण चेहरा देईल, असं मत राजनाथ सिंह यांनी केले. त्याबरोबरच या योजनेंतर्गत भारतीय तरुणांना चार वर्षे लष्करी सेवेत 'अग्नीविर' म्हणून काम करता येणार आहे. तर या योजनेमुळे व्यापक स्तरावर देशाला प्रतिभावान सैनिक मिळतील, असं मत या योजनेची घोषणा करताना व्यक्त केले.
अग्निपथ योजनेत मोबदला काय मिळणार? (What is Benefit of Agnipath)
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 46 हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी वयोमर्यादा ही 17 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असेल असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र युवकांकडून होणाऱ्या विरोधानंतर आता वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी 30, दुसऱ्या वर्षी 33 तर तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मोबदला मिळणार आहे. तर यानंतर अग्निविराला 11 लाख 71 हजार रुपये करमुक्त सेवानिधी आणि सेवाकाळात 48 लाख रुपयांचे विमाकवचही मिळणार आहे, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली.
या योजनेवर आक्षेप काय? ( What is Objection on Agnipath Scheme)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेत चार वर्षे सेवेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून लष्करी सेवेत जाण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून फक्त चार वर्षेच सेवेची संधी मिळणार असल्याने युवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या योजनेमुळे गरीब कुटूंबातील विद्यार्थी पैशासाठी या योजनेत सहभागी होतील. मात्र या योजनेमुळे त्यांच्या उच्च शिक्षणावर परिणाम होईल.
या योजनेच्या माध्यमातून उच्चवर्णिय आणि बहुजन दरी निर्माण करण्याचा डाव असल्याची टीकाही केली जात आहे.
सैनिकांच्या पेन्शनचा ताण सरकारवर येत असल्याने पेन्शनचा विषयच संपून टाकण्यासाठी सरकार ही चाल खेळत असल्याची टीकाही यावर केली जात आहे.
ही योजना बेरोजगारी निर्माण करण्याचा कारखाना बनेल, असाही आक्षेप या योजनेवर घेतला जात आहे.
देशभरात तीव्र पडसाद (Violence spread in many states)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेचे बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, आसाम, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. तर या विरोधाचे आणि हिंसाचाराचे लोण देशातील इतर राज्यांमध्येही पसरण्याचा धोका आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करत बिहारमध्ये युवकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. तर रेल्वेच्या इंजिनला तसेच डब्यांना आग लावण्यात आली. त्याबरोबरच रेल्वेची तोडफोडही करण्यात आली. तर उत्तरप्रदेशातही युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला. त्यामुळे या विरोधाचे लोण देशभर पसरण्याचा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारने दोन वर्ष वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही युवकांचा विरोध कायम आहे.