राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्या: राजेश टोपेंची प्रकाश जावडेकरांकडून अपेक्षा
राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्या
राज्यात कोरोना लसीचा तुटवडा पडल्यानं अनेक ठिकाणी लसीकरण थांबलं आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. "महाराष्ट्रात ५ लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये १० लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे".
महाराष्ट्र सरकारने लसीवरून राजकारण करू नये. महाराष्ट्राला आत्तापर्यंत 1 कोटी 06 लाख 19 हजार 190 लसीचे डोस दिले आहेत. त्यातील 90 लाख 53 हजार 523 वापरण्यात आले आहेत. यातील 6% वाया गेले आहेत. म्हणजे जवळ जवळ 5 लाख. आणि जवळ 7 लाख 43 हजार 280 डोसेस पाईपलाईन मध्ये असून महाराष्ट्र सरकारकडे 23 लाख डोस शिल्लक आहे. अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली होती. त्याला आज राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा. असं टोपे यानी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.