‘वेट अँड वॉच’ मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे आदेश

दोन दिवसांपासून राज ठाकरे टोल च्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही टोलवर आंदोलन केले. तर मुलूंड टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला सांगितली.;

Update: 2023-10-10 02:50 GMT

राज ठाकरे यांनी निवडणूकीपुर्वी टोलचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 पासून राज्यातील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले. तसेच या वाहनांकडून टोल घेतला जात नसल्याचेही सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो व्हिडीओ दाखवून फडणवीस खोटं बोलत असल्याची टीका केली. त्यानंतर दोन दिवसात टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असंही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही. पण आता टोल घेतला जातोय की नाही हे पाहण्यासाठी मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर थांबतील. मात्र तेथे जर टोल घेतला जात असेल तर आम्ही टोल जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मुंबईसह राज्यातील अनेक टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड करत आंदोलन केले. मात्र रात्री उशीरा मुलूंड टोलनाका पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यामार्फत पुढील सुचना देऊस्तोवर कुठलीही भूमिका घेऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.


Tags:    

Similar News