राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसा राज्यातल्या राजकीय घडामोडीचा झपाट्याने वेग वाढत आहे. काही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत तर, काही मतदरासंघात उमेदवारीवरून दोन नेत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आपण पाहतोय. सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. ही जागा कोणत्या पक्षाला जाईल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अशातच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात या जागेवरून चढाओढ सुरू झाली आहे. एकमेकांकडून त्या जागेवर दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.
दरम्यान, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पक्षाकडून संधी मिळाली तर निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे सांगत पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केला आहे. तर मतदारसंघातील कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील, असा विश्वास केळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाणेमधील भाजपच्या नविन झालेल्या कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भाजपसाठी ठाणे लोकसभा महत्वाची असल्याचं सुचक विधान यावेळी फडणवीस यांनी केलं.