संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलं. यावर सध्या सत्ताधारी NDA आणि विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू झालीय. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सूचक ट्विटची चर्चा सुरू झालीय.
लोकसभेत आज विधी व न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातलं ऐतिहासिक विधेयक मांडल. यावर लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी महिला आरक्षणाचं विधेयक याआधीच सभागृहात मांडण्यात येऊन ते मंजूरही झाल्याचं म्हटलंय. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी तर काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांना असं विधेयक जर कुठल्याही सभागृहात मांडून ते मंजूर झालं असेल तर सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचं आव्हान दिलंय.
संसदेतील या गोंधळावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, भाजप आणि काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, “भारतीय समाजात आरक्षण आणि महिला सक्षमीकरणाची बीजं रोवण्याचं काम ना काँग्रेसने, ना भाजपने केलं. ते केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयासाठी भांडणारे काँग्रेस आणि भाजप दोघं सोयीस्कररीत्या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि जात, लिंग, धर्म आधारित सर्वप्रकारचा भेदभाव संपवण्यासाठी बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कार्याला विसरलेत आणि बगल देतायेत, असा थेट आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.
इथल्या पीडित समुहांसाठी राजकीय आरक्षणाची मागणी करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसने पंचायती राज बिल आणण्याच्या दशकांपूर्वीच महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठे पाऊल असलेल्या हिंदू कोड बिलाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला होता. त्यामुळं महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय कोणाला द्यायचेच असेल तर बाबासाहेब आणि फक्तं बाबासाहेबांना द्यावे लागेल, असंही प्रकाश आंबेडकर ट्विटमध्ये म्हणाले.