पक्ष आणि चिन्हावरून राष्ट्रवादीत घमासान, प्रफुल्ल पटेल विरुद्ध रोहित पवार भिडले
अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आमच्या पक्षात फुट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यावरून आता राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.;
प्रफुल्ल पटेल यांनी अमरावतीत बोलताना आम्ही अनेक वर्षे दिल्लीत काम करतो. आम्हालाही कायदा कळतो. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय अजित पवार यांच्याच गटाच्या बाजूने येईल. पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आपल्याकडेच राहिल. कारण विधानसभेतील 43 आमदारांचं संख्याबळ आमच्यासोबत आहे, असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर भाष्य केलं. त्यावरून रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार म्हणाले, त्यांचा निवडणूक आयोगावर जास्त विश्वास आहे. कारण सर्वसामान्य लोकांना निवडणूक आयोगाबद्दल विचारलं तर ते हेच सांगतात की, भाजपच्या हातातील बाहूली म्हणजे निवडणूक आयोग. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोगाचा प्रमुख नेमण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संसदेच्या अधिवेशनात सरन्यायाधीशांना वगळून पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि मंत्री यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोग ही आता भाजपची शाखा बनली आहे. त्यामुळेच पक्ष आणि चिन्हावर दावा करणाऱ्यांचा अहंकार वाढल्याची टीका रोहित पवार यांनी केली.