शरद पवारांचे जुने फोटो टाकणाऱ्यांना 'राजकीय मंकीपॉक्स'ची बाधा, अमोल मिटकरी यांचा खोचक टोला
मनसेने शरद पवार यांचे ब्रिजभुषण सिंह यांच्यासोबतचे फोटो ट्वीट करत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला शरद पवार यांनी रसद पुरवली असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्याला अमोल मिटकरी यांनी खोचक टोला लगावला आहे.;
राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत माझ्या अयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात रसद पुरवणारे नेमके कोण? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आज मनसेने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा खासदार ब्रिजभुषण सिंह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात राष्ट्रवादीने रसद पुरवल्याचा अप्रत्यक्ष आरोप मनसेने केला आहे. त्यावर अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून खोचक प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, शरद पवार यांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय "मंकीपॉक्स " नावाचा आजार झालेला आहे. या आजारापासून महाराष्ट्राने सावध रहावे. काही "मंकी" मर्कटचाळे सोडणार नाहीत. "पांडे बुवा" सारखे पळपुटे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत.
अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्वीट करून त्यामध्ये म्हटले आहे की, आधारवड पवार साहेब, काही फोटो चांगले असतात आणि काही खरेही, हिंदी भाषांतर जाणीवपुर्वक टाळले आहे, असे अमोल मिटकरी यांनी लिहीले आहे.
पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण टिकवण्यात ठाकरे सरकारला अपयश आल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली.
अमोल मिटकरी म्हणाले, ज्या गोपिनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष वाढवला. त्या गोपिनाथ मुंडे यांच्या मुलीला औरंगाबाद येथे झालेल्या जनआक्रोश मोर्चात साधे सन्मानाचे स्थान मिळाले नाही. त्यामुळे मी पंकजा मुंडे यांना विनंती करतो की जिथे आपला अपमान होत असेल अशा माणसांना लाथ मारावी. तुम्हाला राष्ट्रवादीचे दरवाजे कायम खुले आहेत. तुमच्यासारख्या बहिणीची आम्हालाही आवश्यकता आहे, अशी खुली ऑफर अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिली.