निवडणूकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा, भोंग्यांच्या वादावरून बच्चू कडू संतापले

भोंग्याच्या वादावर मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया देतांना राजकीय नेत्यांचे भोंगे बंद करावेत, अशी मागणी केली.;

Update: 2022-04-19 06:05 GMT

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच राज ठाकरे हे भाजपचा अजेंडा रेटत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडी सरकारचे मंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना संताप व्यक्त केला आहे. (Bacchu kadu on loud speaker)

सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच मंत्री बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, मंदिर मशिदीसह निवडणूकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात सर्व मंदिरे, मशिदी, बौध्द विहार, चर्च, गुरूद्वारा यासह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद होते. मात्र या काळात फक्त आणि फक्त रुग्णवाहिकांचा भोंगा सुरू होता. त्यामुळे सध्या भोंग्याच्या वादात पडण्यापेक्षा देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे याचा विचार करायला हवा. तसेच भोंग्यांच्या आडून मुळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे भोंगे बंदच करायचे असतील तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. त्यामध्ये फक्त मंदिर आणि मशिदीवरीलच नाही तर निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांकडून लावले जाणारे राजकीय लोकांचे भोंगेही बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा, अशी संतप्त प्रतिक्रीया बच्चू कडू यांनी दिली. (Bacchu kadu Demand to banned loud speaker in election)

भोंग्याचे राजकारण

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून इशारा दिला. त्यावर राज्यभरातून प्रतिक्रीया उमटल्या. तर त्यापाठोपाठ राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या मिरवणूकीतही याचे पडसाद उमटले. त्यामुळे राज्यातील धार्मिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच राज ठाकरे यांनी उत्तर सभेतही भोंग्यांवरून इशारा देतांना 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचे आवाहन केले आहे. तर यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिले होते. मात्र त्यानंतर नाशिक पोलिसांनी भोंग्याबाबत आदेश जारी केला आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी राजकीय पक्षांकडून लावले जाणारे भोंगेही बंद करावेत अशी मागणी केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 

Tags:    

Similar News