राजकीय विरोधक, व्यक्तिगत शत्रू नव्हेत..
केवळ चोर म्हटले म्हणून दोन वर्षाची शिक्षा आणि खासदारकी रद्द केली आहे ? महिलेवर बलात्कार करणारे, गर्भवती महिलेची हत्या करणारे गुजरातमध्ये मोकाट सोडले.;
केवळ चोर म्हटले म्हणून दोन वर्षाची शिक्षा आणि खासदारकी रद्द केली आहे ? महिलेवर बलात्कार करणारे, गर्भवती महिलेची हत्या करणारे गुजरातमध्ये मोकाट सोडले. त्यांचे जाहीर सत्कार केले. फुलं टाकून त्यांचे स्वागत केले.अशावेळी गुजरातचा कायदा वेगळा कसाकाय वागत असतो याचेही या निमित्ताने देशाला कोडे पडले आहे, नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीवर कठोर शब्दात भाष्य केले आहे ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात परवा जे घडले ते अभूतपूर्व म्हणावे लागेल. एखाद्या राजकीय विरोधकाला व्यक्तिगत शत्रू समजून जे वागवणे सुरु आहे त्यावरून सध्या देशात सुरु असलेल्या राजकीय वातावरणाचा अंदाज यायला मदत होते. वैचारिक विरोधकांना साता जन्माचे वैरी समजून त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्यासाठी प्रसंगी कायदेकानू आणि न्यायव्यवस्था वाटेल त्या दिशेने वाकविण्याची जी कसरत सुरु आहे त्याने देशाचा पुढचा प्रवास अधोरेखित केला आहे. चार वर्षांपूर्वी कर्नाटक मध्ये केलेल्या एका वक्तव्याची तक्रार गुजरातचा कुणी माजी आमदार करतो आणि न्यायमूर्ती आरोपीचा त्यामागचा हेतू समजून न घेता थेट दोन वर्षाची शिक्षा सुनावतो या घटनाक्रमात मूलभूत अधिकार आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला उघडपणे हरताळ फासला जातो. नवल म्हणजे त्याचा देशभर आनंदोत्सव साजरा करीत राहुल गांधी यांचेच पुतळे जाळण्याचा हिडीस उपक्रम साजरा होतो हे अधिक भयंकर आहे.
प्रधानममत्री नरेंद्र मोदींचा अवमान केला असा आरोप ठेवून काँग्रेस नेते राहूल गांधी यांंना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षाची सजा ठोठावली आहे. तसेच त्यांची खासदारकीही रद्द केली आहे. या घटनेनं देशात खळबळ माजली आहे. केंद्रीय संस्था व न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाही पध्दतशीरपणे संपवण्याचे काम चालू आहे. राहूल गांधींची सजा आणि खासदारकी रद्द करण्याचा निर्णय याच कटाचा भाग आहे. छप्पन इंचाची छाती म्हणून छाती बडवणारे सत्ताधीश राहुल गांधींना घाबरले आहेत. लोकसभेत राहूल गांधींनी अदानीबाबत जे प्रश्न प्रधानमंत्र्यांना विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे प्रधानमंत्र्यांना देता आली नाहीत. राहूल गांधींनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असताना मोदींनी उत्तरे न देता राहूल गांधींचे खानदान काढले. संसदेत छाती ठोकून बोलणारे बोगस व पळपुटे असल्याचे या निमित्ताने सिध्द झाले आहे. त्यांनी ज्याला पप्पू ठरवले त्याच पप्पूची यांना इतकी धास्ती वाटावी ? हे विशेष आहे.
राहुल गांधींना ज्या न्यायालयाने शिक्षा सुनावली त्याच न्यायालयाने जामीन देऊन शिक्षेस एक महिन्याची स्थगिती दिली असताना दुसरीकडे संसदेने घाई करीत राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा सोपस्कार उरकून टाकला. एखाद्याला वरच्या कोर्टात अपील करण्याची मुदत मिळाली असताना तेवढा काळ प्रतीक्षा करूनही खासदारकी बाबत संसदेला पुढचा निर्णय नक्कीच घेता आला असता मात्र त्याची वाट न बघता सत्ताधाऱ्यांनी जो उतावीळपणा दाखवला तो कोणत्याही संकेतांना धरून नाही. गांधी परिवाराची एवढी शिसारी निर्माण व्हावी एवढे द्वेषाचे आम्ल सत्ताधारी पक्षाच्या पोटात कसे निर्माण झाले हे देशातील सामान्य जनतेला या घटनेवरून कळून चुकले आहे. आपल्या देशात तरुण मुलींना जिवंत जाळून टाकले जाते,सामूहिक बलात्कार केले जातात त्याचे आरोपी महिमामंडित करणाऱ्या लोकांनी केवळ चोर म्ह्टल्यावरून दोन वर्षाची शिक्षा दिली असे घडले नाही.
केवळ चोर म्हटले म्हणून दोन वर्षाची शिक्षा आणि खासदारकी रद्द केली आहे ? महिलेवर बलात्कार करणारे, गर्भवती महिलेची हत्या करणारे गुजरातमध्ये मोकाट सोडले. त्यांचे जाहीर सत्कार केले. फुलं टाकून त्यांचे स्वागत केले.अशावेळी गुजरातचा कायदा वेगळा कसाकाय वागत असतो याचेही या निमित्ताने देशाला कोडे पडले आहे.ज्यांनी चो-या केल्या, देश लुटून नेला ते मोकाट आहेत. मोदींच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांचे काहीच वाकडे केले जात नाही पण त्यांना चोर म्हणणा-याची खासदारकी रद्द केली जात आहे. वा रे व्वा न्याय ! हा निकाल देणा-याची सुरत न्यायालयीन आहे पण त्याचा आत्मा हुकूमशहाच्या अधीन असल्याचा संशय आहे. त्यांनी ठरवून न्यायालयामार्फत राहूल गांधींचा आवाज बंद करण्याचा खटाटोप केला आहे. देशातल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने लोकशाहीच्या गळ्याभोवती फास आवळणे सुरु केले आहे . राहूल गांधीची सजा हा त्यातलाच एक भाग आहे.
राजकारणात कार्यरत नेत्यांची वक्तव्य तपासत बसले तर प्रत्येक नेत्यावर कदाचित मोजता येणार नाहीत एवढे गुन्हे दाखल होऊन त्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार करता येणे सहज शक्य आहे मात्र आजवर प्रचार सभेतील भाषणे, वक्तव्ये खिलाडूपणे घेण्याची आपली परंपरा पहिल्यांदा भाजपने रोखली आहे. जग ज्याच्याकडे आशेने बघते त्या लोकशाहीचा प्रधानमंत्री आकडे,सनावळ्या थेट ठोकून देतो ,एकदा बोललेल्या खोट्या वक्तव्याचे पुढे कधीही स्पष्टीकरणसुद्धा देत नाही या बद्दल कुणी आणि कोणत्या न्यायालयात खटले दाखल करावेत ? सोनिया गांधींचा उल्लेख '' काँग्रेस की विधवा '' म्हणून केलेला ज्यांना चालतो त्यांना चोर हा शब्द एवढा झोंबतो की राष्ट्रीय स्तरावरील नेत्याला त्यांना थेट तुरुंगात बघण्याची घाई होते. न पटणाऱ्या विचारधारा सुद्धा ज्या देशाने सन्मानित केल्या त्याच देशात राजकारणाचा पट उलटा मांडणाऱ्या लोकांना असा नवा भारत घडवायचा असेल तर यापुढे सामान्य जनतेने सुद्धा सावध झाले पाहिजे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद-9892162248