बुधवारी ५ ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळाव्यासोबतच परळीत पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा असतो. त्यांच्या या दसरा मेळाव्यात काय म्हणणार याकडे सर्वांच लक्ष असणार आहे. त्यामध्ये आता पंकजा मुंडे समर्थकांनी त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या दोन मोठ्या भाजप नेत्यांमध्ये सारं काही आलबेल नाही हे संपुर्ण महाराष्ट्र जाणतोच. त्यात गेल्या काही वर्षांत अप्रत्यक्षपणे त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. पंकजा मुंडे जिथे असतात तिथे फडणवीस नसतात आणि फडणवीस जिथे असतात तिथे पंकजा उपस्थित राहत नाहीत. अशात विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील पंकजांचा तिकीटासाठी साधा विचार देखील केला गेला नाही. त्यामुळे ही दरी आणखी खोल होत चालली आहे हे स्पष्टच आहे.
बुधवारी होत असलेल्या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्य़ा नजरा लागलेल्या आहेत. त्यापुर्वीच आता त्यांच्या समर्थकांकडून त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी आता केली जात आहे. पंकजा मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान देऊन त्यांना बीडचे पालकमंत्री पद द्या अशी मागणी केली आहे. आता त्यांच्या या मागणीचा भाजप विचार करणार का की पंकजांना राष्ट्रीय कार्यकारीणीतच ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.