तेलंगनात राजकारण तापलं, राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारली…
तेलंगनामध्ये पुढच्या वर्षी निवडणूका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेलंगना राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
हैदराबादमधील उस्मानिया युनिव्हर्सिटी मध्ये काँग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यावर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगनामधील टीआरएस सरकार राहुल गांधी यांचा कार्यक्रम होऊ नये. यासाठी विद्यापीठावर दबाव टाकत असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.
दरम्यान या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उस्मानिया विद्यापीठात राहुल गांधी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणताही लिखित आदेश दिलेला नाही. वारंगल जवळील हनमकोंडा या ठिकाणी ६ मे रोजी राहुल गांधी यांची एक सभा आयोजित केली आहे. तसेच ७ मे ला त्यांना विद्यापीठामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस ने 23 एप्रिल रोजीच निवेदन दिलं आहे.
द इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, उस्मानिया यूनिवर्सिटी मधील एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, २०१७ पासूनच विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलिंग ने प्रस्ताव पास केला असून या प्रस्तावानुसार विद्यापीठात शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश...
उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विद्यापीठाच्या आत राजकीय आणि जाहीर सभा घेतल्या जाऊ नयेत, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने हा निर्णय विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांच्या याचिकेवर दिला होता. या याचिकेत राजकीय सभांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं आहे. याबाबत विद्यापीठाच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एखाद्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम गैर - राजकीय असू शकत नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी शनिवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने केली, तर एबीवीपी आणि टीआरएसशी संबंधित कार्यकर्त्यांनीही प्रदर्शन करून आपली मतं मांडली.
राज्य सरकारवर टीका
काँग्रेसचे स्थानिक आमदार जग्गा रेड्डी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राहुल गांधी यांचा कार्यक्रम अराजकीय असल्याचे आम्ही विद्यापीठ प्रशासनाला सांगितले होते, परंतु त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे आधीच ठरवले होते. माजी राज्यसभा खासदार व्ही. हनुमंत राव यांनीही याबाबत विद्यापीठ प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
पुढच्या वर्षी निवडणुका...
तेलंगनात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून सध्या तेलंगनात मुख्यमंत्री के सी आर यांच्या नेतृत्वात टीआरएस पक्षाचं सरकार तेलंगनात आहे. तेलंगनामध्ये टीआरएसची मुख्य लढत काँग्रेससोबत आहे. दरम्यान तेलंगनामध्ये टीआरएस एआयएमआयएमसोबत युती करू शकते. यासोबतच, भाजप आणि टीडीपी देखील राज्यात त्यांची राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.