आदिवासी दिनी तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह
रेशन, रोजगार, शिक्षण व वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करत आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यात जातीयवादी राजकारण सुरू असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांनी आदिवासी व श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या जातीयवादी राजकारणाला जोरदार चपराक देत माकप ने तहसील कार्यालयाचे गेट तोडत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.;
आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींच्या भावनांशी खेळायचे आणि नंतर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे अशी संतापजनक परिस्थिती सध्या तालुक्यात दिसते आहे. रेशनचा काळाबाजार करून आदिवासींच्या अन्नात माती कालवायची, आदिवासींना जंगलच्या जमिनीवर अधिकार नाकारायचे, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, आशा कर्मचारी, घरेलू कामगार, अंगणवाडी कर्मचारी, विधवा, परित्यक्ता व निराधार वृद्धांना शासकीय योजना, वेतन व सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवायचे. शासन व प्रशासनाचे हे अन्यायकारक उद्योग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहन करणार नाही असा इशारा यावेळी माकपने दिला आहे.
तहसील कार्यालयासमोर आदिवासी, कामगार, कर्मचारी, निराधार व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दोनशे श्रमिकांनी आंदोलन सुरू केले असताना आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी भंडारदरा येथे एका खाजगी कार्यक्रमाला निघून गेले. आदिवासी व श्रमिकांच्या आंदोलनाची ही उपेक्षा लाल बावटा खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी यावेळी तहसिलचे गेट तोडत कार्यालयात धडक दिली. तहसील कार्यालयात प्रचंड घोषणा देत प्रशासनाच्या या कृतीचा तीव्र धिक्कार व्यक्त केला. आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाची त्रेधा उडाली. आंदोलकांनी पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आंदोलनात उपस्थित केलेल्या मागण्या धसास लावल्या शिवाय आंदोलक माघार घेणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.
डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, भरती गायकवाड, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे, खंडू वाकचौरे, मथुराबाई बर्डे, नंदू गवांदे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.