आमच्या २७ टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही - डॉ. बबनराव तायवाडे
Nagpur : नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथ यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसींच्या विवीध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे.
देशभरात ६० टक्के असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंज्या आरक्षण असल्याने जातनिहाय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं, यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि ५ फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, "आमच्या २७ टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. आम्ही या आरक्षणासाठी संघर्ष केला आहे आणि ते कायम ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा संघर्ष करू. जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकारने ही मागणी मान्य करून आमच्या हक्कांचे रक्षण करावे." या यात्रेमध्ये ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.