अविश्वास ठराव : ठाकरेंच्या खासदार आणि भाजपच्या मंत्र्यांमध्येच जुंपली

Update: 2023-08-08 14:30 GMT

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झालीय. पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाचे खासदार आणि शिवसेना, भाजपच्या खासदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन करण्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. त्यावर सध्या लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा सुरूय. त्याअनुषंगानं आज शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अरविंद सावंत म्हणाले, “मणिपूरमध्ये हिंसाचार झाला, महिलांवर अत्याचार झाले, तरीही केंद्रातील सरकार ७० दिवस गप्प राहिले. सर्वोच्च न्यायालयानं कानउघाडणी केल्यानंतर पंतप्रधान ३६ सेकंद बोलले. मात्र, आता महाराष्ट्रावर मी बोलणार आहे. काहीजण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. पळपुट्यांनी हिंदुत्वांवर बोलू नये. ‘मंदिरातील घंटा वाजवणारे नाहीतर, दहशतवाद्यांना मारणारे हिंदुत्व पाहिजे,’ असं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं. त्यावर पलटवार करत नारायण राणे म्हणाले, “ अरविंद सावंत यांचं भाषण ऐकताना वाटलं दिल्लीत नाही, महाराष्ट्रातील विधानसभेत बसलोय, असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर बोलताना अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हिंदुत्वाबाबत भाष्य केलं. हिंदुत्वाबाबत एवढा गर्व होता, तर २०१९ साली भाजपाशी गद्दारी करून शरद पवार यांच्याबरोबर युती का केली? तेव्हा हिंदुत्व लक्षात नाही आलं. हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत सावंत बोलत आहेत. मग, ते शिवसेनेत कधी आले?” असा थेट प्रश्नच राणे यांनी सावंतांना विचारला.

अरविंद सावंत यांनी यावेळी थेट नरेंद्र मोदींवरही टीका केलीय. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅशनल करप्ट पार्टी असं म्हटलं होतं. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते, ते तुमच्या सरकारमध्ये सामील झाले, अशी टीकाही सावंत यांनी केलीय. दरम्यान, सावंत यांच्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी नारायण राणे उभे राहिले. त्यांनी म्हटलं की, “ मी १९६६ पासूनचा शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडल्यावर २२० लोकांनी संरक्षण घेतलं होतं. आता जो आवाज येतोय तो मांजराचा आहे. वाघाचा आवाज नाही आहे. पंतप्रधान मोदींवर बोलण्याची त्यांची लायकी नाही आहे. भाजपा, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या बोलल्यावर तुमची लायकी दाखवून देऊ, असा थेट इशाराच राणे यांनी ठाकरे गटाला यावेळी दिला.

Tags:    

Similar News