गेल्या काही दिवसांपासून मोदीविरोधी आघाडी तयार करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रमंचच्या निमित्ताने पवारांच्या दिल्लीतील घरी विरोधकांची बैठक झाली. पण या बैठकीला काँग्रेसचे कुणीही उपस्थित नव्हते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी उभी कऱण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. पण आता शरद पवार यांनी या आघाडीबाबत मोठे विधान केले आहे.
काँग्रेसला घेऊनच आघाडीचा विचार करावा लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजपच्या विरुद्ध सामुदायिक नेतृत्व उभं करावं लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावर सामुदायिक आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, असले उद्योग मी खुप केले आहेत, आता वेळ इतरांना मार्गदर्शन करण्याची आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
तसेच प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या बैठकांबाबत मीडीयातून गैरसमज पसरल्याचे पवारांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर दिल्लीतील बैठक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली, असेही पवारांनी सांगितले आहे.