मुक्ताईनगरमधून खडसेंच्या कन्येला राष्ट्रवादी देणार उमेदवारी, जयंत पाटील यांची घोषणा

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने जळगाव जिल्ह्यातील अनेक समीकरणे बदलली आहेत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठी घोषणा केल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे.;

Update: 2021-02-13 15:20 GMT

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर मधून उमेदवारी देऊ आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आणू अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पण यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्येच राजकारण तापायला सुरवात झाली आहे, कारण या घोषणेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकात पाटील नाराज झाले आहेत.

एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या भाजपच्या उमेदवार असताना मागच्या वेळेस आमच्याकडून चूक झाली, नाहीतर त्या निवडून आल्या असत्या. मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत मोठया मताधिक्याने निवडून आणू अस जाहीर आश्वासन त्यांनी दिलं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी खडसेंचे कट्टर विरोधी असलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अपक्ष उमेदवारी देऊन रोहिणी खडसेंविरुद्ध निवडून आणलं. मात्र आता राष्ट्रवादीने रोहिणी खडसेंना थेट उमेदवारीच जाहीर केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

Full View


मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांचं राजकीय वैर सर्वश्रुत असतांना रोहिणी खडसेंच्या निमित्ताने राजकीय समीकरण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत खान्देशातील नेत्यांमध्ये उघड गटबाजी असल्याचंही समोर आलं. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार आलं. त्यानंतर पहिल्यांदाच पक्ष बांधणीला सुरुवात करत राष्ट्रवादीने काँग्रेसने परिवार संवाद यात्रा काढून आगामी निवडणुकीचे आपले इरादे स्पष्ट केलेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोली येथून ही यात्रा सुरू केल्यानंतर गेले तीन दिवस संवाद यात्रा खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध मतदारसंघात दाखल झाली.

भाजप सोडून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पहिलाच दौरा होता. मात्र त्यांच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनर वरून वाद झाला. जळगावचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लावलेल्या भव्य पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो नसल्याने गटबाजीचे उघड प्रदर्शन झाले. माध्यमांमध्ये बातम्या आल्या नंतर खडसेंचा फोटो नसलेलं पोस्टर उतरवून नव्याने पोस्टर लावण्याची नामुष्की नेत्यांवर आली. जळगाव ग्रामीण मेळाव्यात पोस्टरवर फोटो न लावल्याने जयंत पाटील यांच्यासमोर नेत्यांची शाब्दिक चकमक उडाली. शेवटी प्रदेशाध्यक्षांना वाद मिटवावा लागला.

धुळे जिल्ह्यातही माजी आमदार अनिल गोटे आणि संदीप बेडसे यांचे समर्थक समोरासमोर भिडले. राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंच्या आगमनाने भाजपमधील नेते कार्यकर्ते मोठया संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं अनेकांना वाटलं होतं. मात्र कोणत्याही मोठ्या नेत्याने प्रवेश केला नाही. बोदवड आणि मुक्ताईनगरमधील खडसेंचेच समर्थक असलेल्या बाजार समिती सदस्यांनी प्रवेश केला.

Tags:    

Similar News