"भाजपची B टीम नाही, हे सिद्ध करा", जयंत पाटील यांचे MIM ला आव्हान

Update: 2022-03-19 10:35 GMT

एकीकडे भाजप आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष चिघळलेला असताना आता राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे, याला कारण ठरले आहे ते MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलेली ऑफर....यावर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.

MIMचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर जलील यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. "भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. आम्ही भाजपची बी टीम आहोत असा आरोप आमच्यावर केला जातो. आमच्यामुळे भाजप जिंकते असाही आरोप आमच्यावर करण्यात येतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला भेटायला आल्यानंतर आम्ही त्यांना ऑफर दिली आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली नाही. आता राष्ट्रवादी आरोप सिध्द करणार आहे की युती करणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे" असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

"आम्ही काँग्रेसलाही युतीचे आवाहन केले आहे. पण खरं तर आम्ही कोणालाच नको आहोत फक्त मुस्लिम मतं हवी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष का मानतात? जर त्यांना मुस्लिम मत हवी असतील तर आमच्यासोबत युती करा" असेही जलील यांनी म्हटले होते.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, राजेश टोपे हे इम्तियाज जलील यांच्याकडे त्यांच्या मातोश्रींचं निधन झाल्याने सांत्वनासाठी गेले होते. तेव्हा त्यावर राजकीय चर्चा करणे योग्य नाही आणि राजेश टोपे यांनी तशी चर्चाही केली नसेल, असे जयंत पाटील म्हणाले. पण आतापर्यंत उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपची बी टीम होण्याचाच MIMचा प्रयत्न होता हे उघड झाले आहे. आपण बी टीम नाहीत हे सिद्ध करायचे असेल तर आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत MIMची भूमिका काय आहे, हे त्यांनी सांगावे, ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत की भाजपाच्या विजयासाठी उत्सुक आहेत, हे लगेच कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


Full View

Tags:    

Similar News