हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर करायचा, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य
ST कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने धक्कादायक विधान केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी चपला फेकत निदर्शने केली. त्यावरून राज्यात वातावरण तापलं आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या आमदाराने हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर करायचा असं वक्तव्य केलं आहे.
राज्यात पाच महिन्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर हा संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अचानक ST कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केला. या प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, हल्लाच करायचा होता तर मातोश्रीवर करायचा, शरद पवारांच्या घराचा काय संबंध? असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
पुणे जिल्ह्यातील खेड आळंदीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर ST कामगारांनी केलेल्या हल्यावर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, शरद पवार यांचा एसटी संपाशी काहीही संबंध नाही. कारण राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आहेत. त्यामुळे त्यांच्या तिथे हल्ला करायचा होता. तसेच राज्यात जितकी आंदोलने झाली. त्या आंदोलनाचा शेवट बारामतीत व्हायचा. त्यामुळे या प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. यामागे कोणीतरी अदृष्य शक्ती आहे. हा प्रकार जाणीवपुर्वक करण्यात आला आहे. जर असा हल्ला करायचा होता तर तो मातोश्रीवर करायचा म्हणजे त्याची काय किंमत असते ती समजली असती, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.