राज ठाकरे यांच्या भाषणावर ED च्या कारवाईचा परिणाम, रूपाली ठोंबरेंची प्रतिक्रीया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा काल शिवाजी पार्कवर पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लश्र लागलं होतं पण त्यांचं भाषण झाल्यानंतर मनसे भाजपची बी टीम झालीये, इडीच्या कारवाईनंतर राज यांची भाषा बदलली असे आरुप होउ लागलेत. कालच्या त्यांच्या भाषणात त्यांनी महा विकास आघाडीवर टीका करताना राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर पुर्वाश्रमीच्या मनसैनिक आणि सध्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरे हे जाती धर्मावरून तरूणांची माथी भडकवत आहेत असा आरोप केला. मॅक्स वुमनशी त्या बोलत होत्या.
आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याच्या राज यांच्या आरोपाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "१९९९ पासून राष्ट्रवादीमध्ये अनेक जातीचे, धर्माचे,पंथाचे लोक आहेत. अनेक जण मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीयवाद होतो हे म्हणणं अत्यंत चुकीचं ठरेल. राज यांच्या तोंडी अचानक भाजपची वाक्य कशी येऊ लागली हे त्यांनाच ठाऊक!"
भाजप आणि मनसेची सेटलमेंट झालीये अशा चर्चेला कालच्या भाषणापासून उधाण आलंय. याच प्रश्नावर बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, "भाजप पुर्वीपासून मनसेचा वापर करत आलीये. भाजपने लावलेल्या इडी आणि सीबीआयच्या धाडींमुळे ही भाषा बदलेली आपल्याला दिसतेय. शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत जे इडीच्या कारवायांना घाबरलेले नाहीत."
छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टिकेवर बोलताना त्या म्हणाल्या की, " छगन भुजबळ यांच्यावर झालेले दोषारोप सिध्दच झालेले नाही त्यामुळे ते मंत्री असण्याला विरोध होऊच शकत नाही. तडीपार असलेले अमित शहा जर देशाचे गृहमंत्री होऊ शकतात तर मग भुजबळ हे राज्याचे कबिनेटमंत्री नक्कीच होऊ शकतात."
राज ठाकरे हे फायर ब्रँड नेते आहेत पण काल ते असं भाजपची स्क्रीप्ट का वाचत होते हे अनाकलनीय आहे. पण अशा इडीच्या कारवायांना महाविकास आघाडीचे कोणतेही नेते घाबरणार नाहीत. पण राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर इडीच्या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे जाणवत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राज्यात भाजपला कुणीही गांभिर्यानं घेत नसल्यामुळे भाजप अशा पध्दतीने सरकारी यंत्रणांच्या कारवाया करून इतर पक्षाच्या नेत्यांचा वापर करत आहे. भोंगा उतरवणे हा कोणता विकास आहे? कोणता रोजगार आहे? आपल्या तरूणांना कुठे आणखी २५ वर्षे मागे नेताय? कशाला आमच्या तरूणांची माथी भडकवताय? का आम्हाला एका मर्यादीत कक्षेत बांधून ठेऊ पाहताय. तरूणांना जेलच्या वाऱ्या का करायला लावताय? असे अनेत प्रश्न रूपाली पाटील ठोंबरे यांनी कालच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर उपस्थित केले आणि भाजपवर टीका देखील केली आहे.