"कर नाही तर डर कशाला?" , भाजपचा नवाब मलिक यांना टोला

Update: 2022-02-23 06:42 GMT

राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने त्यावर भाजपने मलिक निर्दोष असतील तर सुटतील असे सांगत कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रीया भाजपने दिली आहे.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप ईडीचा वापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतो. त्यातच नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र नवाब मलिक निर्दोष असतील तर सुटतील, अशी सावध प्रतिक्रीया भाजपने दिली आहे.

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाजपच्या अधिकृत ट्वीटरवरून प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, आदरणीय शरद पवार जी, आरोप केल्याने किंवा पत्रकार परिषद घेतल्याने कारवाई करायला हे काही राज्यातील महाविकास आघाडी सरकार नाही. चौकशी ही पुराव्याच्या आधारावर होते. जर निर्दोष असतील तर सुटतील अशी सावध प्रतिक्रीया भाजपने दिली. तसेच नवाब मलिक बोलत होते म्हणून ईडी कारवाई करत असेल तर कोर्ट जाब विचारेल, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.

पहाटेच ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक यांची हजेरी. आता नवाब मलिक यांना कळले असेल की, पत्रकार परिषद घेऊन वाटेल तसे बोलून जर गुन्हा केला असेल तर तो लपवला जाऊ शकत नाही. कारवाईच्या भीतीने आगपाखड करणाऱ्या आणखी एका नेत्याने लक्षात घेतले पाहिजे. कारण कर नाही तर डर कशाला? असा सवाल भाजपने केला आहे.

नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी 'डरनेका कायकू....' असे म्हणत टोला लगावला.

भाजप नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यामध्ये अनिल बोंडे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, नवाब चा कबाब झाला...

अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर ट्वीट करून प्रतिक्रीया दिला आहे. त्यामध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला.

तसेच पुढे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हे होणारच होते असे उसासे टाकले आहेत. मात्र दाऊदशी संबंध ठेवणे? त्यांच्याशी व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही. नसेल तर त्याची काही विशेष कारणे आहेत का?'

Tags:    

Similar News